रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आता तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव जवळ येऊन ठेपले आहे. कीव शहरातील नागरिकांनी घरातच थांबावे किंवा कुठेतरी आश्रय घ्यावा, असा इशारा रशियाच्या सैन्याने दिला आहे. दरम्यान कीव शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट झाल्याचे आवाज ऐकू येत आहेत.
आतापर्यंत काय काय घडले?
रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे, याचा अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही. पण युक्रेनच्या अध्यक्षांनी १३७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तर रशियाच्या १ हजार सैनिकांना मारण्यात यश आल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. पण रशियाच्या लष्कराने आतापर्यंत याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.
अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. युक्रेनवर विनाकारण केलेल्या हल्ल्याला पुतीन हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युरोपियन युनियनने तर रशियाच्या मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने तर प्रवास बंदीसह आणखी काही कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली आहे. तर युरोपियन युनियनने SWIFT या जागतिक आर्थिक प्रणालीमधून रशियाला काढण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पुतीन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅव्हरोव्ह यांच्यावर वैयक्तित निर्बंध लादण्यात येणार आहेत.
तिकडे कीव शहराजवळ रशियाचे एक मालवाहू विमान पाडण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या काही अधिकाऱ्यांनी दिली आहे, यामध्ये रशियन सैनिक देखील होते, अशी माहिती असोसिएटेड प्रेसने दिली आहे.
Russia VS Ukraine : युद्धाचा तिसरा दिवस, रशियाचे १ हजार सैनिक ठार?दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी कीव शहर सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला आहे आणि आपण आपल्या कुटुंबासह युक्रेनमध्येच थांबणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. मला इथे लढायचे आहे, मला शस्त्रास्त्रांची गरज आहे, इथून जाण्यासाठी गाडीची नाही, या शब्दात झेलेन्स्की यांनी अमेरिकेला निरोप दिला आहे.