आरक्षणाचं झालं काय? वैदू समाजापर्यंत आलंच न्हाय !
आरक्षणाचं झालं काय? वैदू समाजापर्यंत आलंच न्हाय ! What happened to the reservation? Vaidu has not reached the community!;
वर्षानुवर्षे जंगलाती दरीखोऱ्यात धुंडाळत त्यातील जडीबुटी गोळा करून गावोगाव जाऊन आयुर्वेदिक औषध विक्री करणारी भटकी जमात म्हणजे वैद्य अथवा वैदू समाज होय. कधीकाळी आयुर्वेदाला देशभरात महत्व होते त्यामुळे लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाकडे होता. पण काळाच्या ओघात व बदलत्या जीवनशैलीमुळे आयुर्वेदापेक्षा अँलुपॅथीकडे लोक वळले आणि वैदू समाजाच्या हातचा रोजगार गेला. पुरातन काळापासूनच आयुर्वेदिक जडीबुटी घेऊन देशोदेशी फिरणारा हा भटका समुदाय या फिरस्ती जीवनमानामुळे स्थैर्य मिळवू शकला नाही. त्यामुळे वैदू समाजातील नागरिकांना स्वतःची घरे, शेतजमीन, शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्थैर्य कधी मिळालच नाही.
पूर्वीपासूनच भटका असणारा वैदू समुदाय आजही आपल्या उन्नतीसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी गावोगाव माती धुंडाळात फिरत आहे.आपण ऑटोमिक पावर,5 जी आणि देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना व आपण देशाचे अमृत मोहोत्सवी वर्षे साजरे करत असताना आजही ह्या समाजातील पालात अद्यापही लाईट,गॅस, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजाही आजतागायत पोहचल्या नाहीत. आजही हा समाज शहराबाहेर रस्त्याच्याकडेला, कचराकुंडी असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आपली पाल टाकून मुलांबाळासह वास्तव्य करत आहे हे दाहक सत्य आहे.
वर्षानुवर्षे गावोगाव आयुर्वेदिक जाडीबुटी विकून परंपरागत व्यवसाय करणाऱ्या ह्या समाजाचा हातचा रोजगार आता अँलुपॅथी दवाखान्यामुळे गेलाय. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी तेलाच्या रिकाम्या डब्ब्यापासून चाळण्या,डब्बे, झारे बनवण्याचे व विकण्याचे काम आता करावे लागत आहे. तर ह्या समाजातील महिला सुया,मणी,पोत,शिकेकाई आदी वस्तू विकून त्यातून भाजी,भाकरी,गहू,तांदुळ घेऊन आपल्या कुटुंबाचा गाडा धकवतात.
या समाजाच्या पिढयानपिढ्या झोपडीत आपले आयुष्य काढत आल्यात आणि यांच्या पदरीही आद्यप झोपडीच लिहलेली आहे. आजही रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या वैदु सनजातील तरुण तरुणी अद्याप डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक,उच्चपदस्थ अधिकारी नाहीये. एवढेच काय तर ह्या समाजातील महिलांना गर्भार अवस्थेत मिळणाऱ्या शासकीय आरोग्य सुविधा तर सोडाच पण बाळंतपणंही ह्याच झोपडीत करावे लागते हेच विदारक सत्य आहे.त्यामुळे अँटॉमीक पावर होऊ पाहणाऱ्या या देशात वैदू समाजाचे भवितव्य स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही अंधकारमयच आहे असेच म्हणावे लागेल.