राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आता टीका करू लागले आहेत. राहुल गांधी यांनीच एक लीटर आटा म्हणत त्यांच्या हाती आयतं कोलीत दिलं म्हणा पण या शिवाय या यात्रेतील कंटेनर रूम्स वरून आता भाजप काँग्रेसवर टीका करू लागली आहे. या कंटेनर रूम्सचं प्रकरण नेमकं काय प्रकरण आहे पाहुयात.
सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या कन्याकुमारी येथुन या यात्रेला सुरूवात झालीये. ११९ लोकांसह राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा दक्षिणेतून उत्तरेकडे निघाली आहे. त्यांच्या यात्रेमध्ये कन्याकुमारी ते काश्मीर असा ३,५७० किलोमीटरचा प्रवास असणार आहे. या यात्रेमध्ये हजारो नागरीकांशी संवाद साधला जाणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
मात्र या यात्रेतील लोकांसाठी दिल्या गेलेल्या सोयीसुविधांवरून भाजप आता काँग्रेसवर टीका करू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील रूम कंटेनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या काळात हॉटेल ऐवजी मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या प्रमुख नेत्यांच्या राहण्याची सोय म्हणून कंटेनर रूमची व्यवस्था केली आहे.या कंटेरनमध्ये काही कंटेनर १२ बेडचे आहेत, तर काही चार बेड, काही दोन, तर काही एक बेडचे आहेत. या कंटेनर रूममध्ये एअर कंडिशनची व्यवस्था देखील आहे. या यात्रेत एकूण ६० कंटेनरमध्ये २३० यात्रेकरूंची राहण्याची सोय करण्यात आली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील या कंटेनरवरून भाजपाने टीका केली आहे. भाजपाची ही टीका प्रामुख्याने आलिशान रूम असणाऱ्या कंटेनरवरून आहे. मात्र, काँग्रेसने हे आरोप फेटाळले आहेत. या कंटेनर रूम अगदी सामान्य असून त्यात केवळ आरामाची सुविधा असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे.