आम्ही भारत म्हणू, इंडिया म्हणू, हिंदुस्थानही म्हणू सर्व आमचंच - उद्धव ठाकरे
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. त्यासोबतचं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचाही पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांनी जळगावात जाहिर सभा देखील घेतली यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला करताना मोठा गौप्यस्फोटही केला.
दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की "राम मंदिराचं येत्या 23 जानेवारीला उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या दिवशीच उद्घाटन होणार आहे. मी त्याचं स्वागत केलं. पण उद्घाटनामागे एक डाव असू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या उद्घाटनाला लाखो हिंदूंना बोलवायचं. बस, रेल्वे आणि ट्रकने बोलवायचं. आणि परतताना एखादा गोध्रा घडवायचा असं होऊ शकतं. हल्ला घडवू शकतात. कोणत्या तरी वस्तीत बस जाळायची. दगडफेक करायची. माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील. घरांच्या होळ्या पेटतील. आणि त्यावर हे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील. हे डावपेच त्यांचे होतील, असं सांगतनाच अशी भीती टीएमसीच्या खासदारानेही वर्तवल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की "भाजपकडून इंडिया ऐवजी भारत शब्द वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. हे घाबरले आहेत. त्यांना वाटलं समोर कोणीच नाही. पण जनताच त्यांच्यासाठी आव्हान झाली आहे. आम्ही इंडिया नाव घेतल्यानंही त्यांना खाज सुटली आहे. पक्ष फोडाफोडी सुरू आहे. आता आग्यामोहळ उठलं आहे. खाज परवडेल पण दंश परवडणार नाही. इंडियाचं भारत केलं. एवढं घाबरले आहेत. जुडेगा भारत आणि जितेगा इंडिया असं आम्ही म्हटलंय, आम्ही भारत म्हणू,. इंडिया म्हणू आणि हिंदुस्थानही म्हणून. सर्व आमचंच आहे. आता त्यांनी प्रेसिडेंट ऑफ भारत, प्राईम मिनिस्टर ऑफ भारत, असं सुरू केलं. मला वाटलं देशाला स्वत:चं नाव देतात की काय? असा टोला ही यावेळी ठाकरेंनी लगावला.