अपघातांची मालिका थांबेना, भरधाव ट्रॅव्हल्स पलटली

गेल्या काही दिवसांपुर्वी बुलढाणा जिल्ह्यात बसचा अपघात झाला होता. त्यानंतर आता अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता वर्धा जिल्ह्यात आणखी एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.;

Update: 2023-10-05 06:58 GMT

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. त्यातच बुलढाणा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर बसमधील प्रवासी संख्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र या घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून वर्धा जिल्ह्यात आणखी एका बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्सची पलटी झाल्याने मोठा अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तर आठ जण यात जखमी झाले आहेत.

ट्रॅव्हल्स क्रमांक सी बी 19 - एफ 3366 ही हैद्राबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तर पन्नासच्या वर भरगच्च प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये भरले असल्याचे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांचे म्हणणे आहे. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहोचली. छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज चालकाला आला. खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले आहेत. एसी कोच असलेल्या या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवासी क्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News