विनायक मेटे यांच्या अपघातात काही काळंबेरं आहे का?- अजित पवार
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मात्र यानंतर हा अपघात की घातपात अशा चर्चांना उधाण आले. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे.;
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मात्र त्यांच्या ड्रायव्हरने वारंवार बदललेल्या जबाबामुळे मेटे यांचा अपघात की घातपात अशी चर्चा सुरू झाली. त्याबरोबरच रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यावरून अजित पवार यांनी विधानसभेत शंका उपस्थित केली होती. वर्षा गायकवाड यांच्या लक्षवेधी सूचनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर अजित पवार बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबई पुणे महामार्गावर सगळ्यात जास्त ट्रॅफिक असते. तर हा महामार्ग सध्या 6 लेनचा आहे. पण तो 8 लेनचा करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. पुढे अजित पवार यांनी या महामार्गासाठी जागा राखीव असल्याची माहितीही दिली. तसेच त्यापैकी दोन लेन या मोटार आणि २ लेन अवजड वाहनांसाठी कराव्यात, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, गाडीच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोठा दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे. त्यातच काही आमदारांना लाख- लाख रुपये दंड झाला आहे. मात्र तरीही 8 लेनच्या बाबत तुम्ही निर्णय घेणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, अपघात झाल्यानंतर तो कुणाच्या हद्दीत आहे. याचा विचार न करता ज्यांना फोन आला आहे त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहचून मदत करायला हवी, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, विनायक मेटे यांचा ड्रायव्हर सातत्याने आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे त्रयस्थ लोकांना शंका उपस्थित होत आहे की यामध्ये काही काळंबेरं आहे का? मात्र शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जे काही सत्य असेल ते बाहेर येईलच. पण याबरोबरच विनायक मेटे यांच्या पत्नीने काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे का? पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली का? या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? अशा काही मागण्या केल्या आहेत.
तसेच या प्रकरणाचा विसर न पडता आठ लेनचं काम करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. त्यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांच्या अपघाताची केस cid कडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच यामध्ये कुणाचीही जराशी जरी चूक आढळली तरी त्याची हयगय केली जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.