वाहून गेलेला रस्ता बनवण्यासाठी गावकऱ्यांनी उभारला निधी, सरकारी मदत नाहीच
रायगड : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने कोकणाला चांगलेच झोडपले होते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कुठे दरड कोसळली तर कुठे रस्ते वाहून गेले. आता तीन आठवडे उलटून गेले आहेत, पण अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. पोलादपूर तालुक्यातही देवळे- दाभेळ हा रस्ता अतिवृष्टीत वाहून गेला आहे. 25 दिवसांपासून येथील वाहतूक बंद असल्याने य़ा गावांचा संपर्क तुटला आहे. अखेर सरकारच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन निधी गोळा केला आहे. पर्यायी खाजगी जागेतून रस्त्याचे काम सोमवारपासून सुरू केले आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याने या गावाचा संपर्क पुन्हा जोडला जाणार आहे.
पोलादपूर तालुक्यातील देवळे-कारंजे-लहुलसे-दाभेळ हा रस्ता अतिवृष्टीने वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरील आठ ते दहा गावाचा संपर्क तुटला आहे. रस्ता वाहून गेल्याने वाहतूक बंद आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना जंगल किंवा खाजगी जागेतून वळसा घालून पायपीट करावी लागत आहे. 25 दिवस उलटूनही बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीसाठी हालचाली सुरू न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी याबाबत पुढाकार घेतला.
वाहून गेलेला रस्ता हा पुन्हा तयार करणे कठीण असल्याने पर्यायी रस्त्यासाठी कारंजे गावातील घाडगे कुटूंबाने मनाचा मोठेपणा दाखवून जागा दिली आहे. याबाबत ग्रामस्थांनी निधी गोळा करून घाडगे यांना जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. घाडगे यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील गावांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित होणार आहे.