भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांसह विक्रेते अडचणीत

नाशिक जिल्ह्यासह सटाणा तालुक्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेते चिंतेत आहेत.;

Update: 2021-08-27 04:15 GMT

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह सटाणा तालुक्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेते चिंतेत आहेत. भाजीपाल्याची आवक वाढून दर घसरल्याने बाजारात मंदी पसरली असून , खरेदी केलेला माल विकणेही अवघड झाल्याचे विक्रेते सांगत आहे.

तालुक्यात सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. स्थानिक बाजारपेठे सोबतच महाराष्ट्र आणि गुजरातच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नाशिकचा भाजीपाला पाठविला जातो. स्थानिक पातळीवरही भाजीपाल्याची विक्री होते.गेल्या पंधरवड्यापासून भाजीपाल्याचे दर मात्र प्रचंड कोसळले आहेत. साहजिकच यामुळे हजारो रुपयांचे भांडवल गुंतवलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.

एवढेच नाही तर हा भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबत सटाणा शहरातील तरुण भाजीपाला विक्रेता विकी जाधव यांनी बोलताना म्हटले की, ज्या दरात भाजीपाला खरेदी केला ती किंमत देखील मिळणं अवघड झालं आहे, त्यात पावसाचे वातावरण असल्याने भाजीपाला सडत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे तर नुकसान होत आहेच , सोबतच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव देता येत नसल्याने ते देखील संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांना लागवड खर्च देखील निघत नसल्याने ते भाजीपाला फेकून देत आहेत, मागच्या दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकून दिल्याने अनेक ठिकाणी लाल चिखल झालेला पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News