रायगड : राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, केळीसह हाताशी आलेली सर्व पीकं उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर ह्यांनी केली आहे.
पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न देता शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही. सरकारने हे ढोंग बंद करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
पावसामुळे ३३% नुकसानीच्या निकषांहून अधिक पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. ओल्या दुष्काळाकरीता कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई जाहीर होते. ही नुकसानभरपाई अपुरी असून अल्पबाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर ह्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. पुन्हा मुख्यमंत्री दौरा करणार आहेत, असे जाहीर केले आहे, हा फार्स सरकारने बंद करावा असे आवाहन देखिल वंचितच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची वीज पुरवठा तोडणी थांबवा..
थकित वीज बिलाच्या नावावर शेतकऱ्यांची सक्तीने वीज पुरवठा खंडित करण्याचे काम वीज मंडळाच्या वतीने सुरू आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी मागणी देखील रेखा ठाकूर यांनी केली आहे.