जळगाव : चोपडा येथील श्री.व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे नवरात्र उत्सवात पार पडणारा वहनोत्सव व रथोत्सव यंदाही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे स्थगित करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे, संस्थाचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी यांच्या वतीने विश्वस्त प्रवीण गुजराथी यांनी हा निर्णय जाहिर केला आहे. दरम्यान वहनोत्सव व रथोत्सव भाविकांच्या श्रध्दांचा विचार करता मंदिरातच साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चोपड्यात वहनोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते विजया दशमी या नवरात्र काळात शेकडो वर्षांपासून सुरु आहे.नवरात्रीचे नऊ दिवस श्री.बालाजी महाराज विविध वहनांवर आरुढ होवून शहरातील विविध भागात भक्तांना भेटीसाठी जात असल्याची परंपरा आहे.या वहनोत्सवाचे जोरदार स्वागत होत असे , भाविक आपआपल्या परिसरात श्रद्धेने आरती करून बालाजींचे स्वागत करीत असत.तसेच श्री.व्यंकटेश बालाजी मंदिरापासून एकादशीला रथोत्सवनिमित्त रथारुढ श्री.बालाजींचा रथ निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री भाविकांना दर्शनार्थ मुक्कामी ठेवण्याची परंपरा आहे. तर द्वादशीला बाजारपेठ मार्गाने बालाजी महाराजांचा रथ मंदिरात जवळ परत येण्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्यानिमित्ताने शहरात यात्रा भरण्याची मोठी परंपराला गेल्या वर्षापासून कोरोनाचा पादुर्भावाने व शासनाच्या घातलेल्या निर्बंधामुळे पहिल्यांदाच स्थगित करण्यात आला होता व यावेळी देखील स्थगित करण्यात आला आहे.
यावर्षी प्रमाणे यंदा ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान वहनोत्सव पार पडणार होता. तर दि.१६ आक्टोबरला रथोत्सव पार पडणार होता , मात्र कोरोना महामारीच्या संसर्गाचा विचार करता हा उत्सव यंदा स्थगित करण्यात आला आहे.
यंदा मंदिरातच होणार दर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वहनोत्सव व रथोत्सव रद्द करण्यात आला असला तरी भाविकांच्या सोयीसाठी दररोज विविध वहनांवर आरुढ होवून मंदिरातच श्री.बालाजी महाराज दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.तसेच रथोत्सव देखील मंदिराजवळच पार पडणार आहे. दररोज रात्री साडेसात ते नऊ वाजेदरम्यान भक्तांना दर्शन करता येणार आहे. यावेळी भाविक भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.व्यंकटेश बालाजी मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे. यावेळी विश्वस्त प्रवीण गोपाळदास गुजराथी,नितीन (लालाभाई) गुजराथी,संजय सोमाणी,गिरिष गुजराथी आदि उपस्थित होते.