पालघरमच्या अतिदुर्गम भागात ड्रोनच्या साह्याने लसपुरवठा
अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने ड्रोनच्या माध्यमातून लसींचा पुरवठा करण्याची मोहिम हाती घेत यशस्वी केली
पालघर // अतिदुर्गम आणि डोंगराळ असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीचा (Corona Vaccine) पुरवठा करण्यात प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने ड्रोनच्या (Corona Vaccination Delivery by Drone) माध्यमातून लसींचा पुरवठा करण्याची मोहिम हाती घेतली आणि यशस्वीही केली.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जत या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतुकीची व्यवस्था नसल्याने कोरोना लसीकरण पुर्ण करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची मोहिम आखली. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील जत या गावी ड्रोनद्वारे लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.
अतिदुर्गम व डोंगराळ भागात लसीचा पुरवठा करण्याच्या मोहिमेची सुरुवात आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य संचालक डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आली. तर जत या गावात पोहचण्यासाठी 1 तास वेळ लागत होता. मात्र ड्रोनच्या माध्यमातून लसींचा पुरवठा केवळ 9.5 मिनिटात करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि खराब रस्ते यांमुळे लसींचा पुरवठा करण्यासाठी 1 तास लागत होता. मात्र ड्रोनच्या माध्यमातून केवळ 10 मिनिटात लसींचा पुरवठा शक्य झाला.
तर डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, आरोग्य विभागाकडून हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे. तसेच त्यासाठी किती किंमत लागेल त्याची चाचपणी केली जात आहे. जेणेकरून भविष्यात हा प्रोजेक्ट कोणत्या भागात राबवता येईल, याचा अंदाज येईल. हे ड्रोन 5 किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचा माल 15 ते 20 किमी पर्यंत नेऊ शकतात.
ड्रोन मुंबईत राहणाऱ्या घेलाशा याने उडवले. तर त्याने यावेळी माहिती देताना म्हटले की, आमचे बेस स्टेशन जव्हार येथे होते. तर आमचे पायलट उड्डाण जत गावात होते. सहसा लस पोहचण्यासाठी 1 तासांचा वेळ लागणाऱ्या गावात आम्ही केवळ 9.5 मिनिटात 300 लसींचा पुरवठा केला.
यापुर्वी तेलंगणा आणि उत्तराखंडमधील गावांमध्ये ड्रोनद्वारे लसींचा पुरवठा केला होता. सप्टेंबरमध्ये तेलंगणात हैद्राबादपासून 75 किमी असलेल्या विकाराबाद येथे ड्रोनद्वारे औषधांचा पुरवठा केला होता.