उत्तराखंड मध्ये ढगफुटी, हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, मृतांचा आकडा वाढला

उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. त्यापार्श्वभुमीवर काय आहे परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2022-08-21 02:32 GMT

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. तर या पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्याने मृतांचा आकडा 21 वर पोहचला आहे.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर, सिरमौर, चंबा, मंडी, कांगडा या पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच कुल्लू या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्याबरोबरच उत्तराखंडमध्येही झालेल्या ढगफुटीमुळे पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे, त्यांमुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबरोबरच हिमाचल प्रदेशच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन (SDRF) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यापैकी 34 ठिकाणी पुरस्थिती आणि भुस्खलन (Landslide) च्या घटना घडल्या आहेत.

हिमाचल प्रदेश आणि पंजाब रज्याच्या सीमेजवळ असलेल्या कांग्रा या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे पठाणकोटजवळील चक्की रेल्वे ब्रिज कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चंबा जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक जणाच्या मृतदेहाचा शोध लागला नाही. मात्र उर्वरित दोन जणांचे मृतदेह मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हिमाचल प्रदेश सरकारने पुरस्थिती आणि भुस्खलनाच्या घटना लक्षात घेऊन तातडीने बैठक घेत 232 कोटी रुपयांचा निधी आपत्कालीन निधी म्हणून मंजूर केला आहे. तर निर्माण झालेल्या पुरस्थितीमुसे हिमाचल प्रदेशातील 742 रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

हिमाचल प्रदेशात भुस्खलन आणि पुरस्थितीमुळे 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यातच अशाच प्रकारची पुरस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मदत पोहचवण्यासाठी आदेश देत मृतांबद्दल शोक व्यक्त केला.

Tags:    

Similar News