उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत दलित महिलेने तयार केलेले जेवण करण्यास नकार दिला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सर्वसामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दलित महिलेने तयार केलेले जेवण खाण्यास नकार दिल्याने हा सर्व वाद चांगलाच चर्चेत आला होता. आता या महिलेला पुन्हा एकदा सेवेत रुजू करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सर्वसामान्य प्रवर्गातील महिलेने तयार केलेले जेवन खाण्यास दलित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नकार दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. शुक्रवारी शाळेच्या व्यवस्थापन समितीची बैठक झाली. ज्यामध्ये चंपावतचे मुख्य शिक्षण अधिकारी आर. सी. पुरोहित यांनी सरकारने सुनीता देवी यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तराखंड सरकारने सुनीता देवी नावाच्या महिलेला सुखीधांग गावातील सरकारी शाळेत मुलांना जेवण तयार करण्यासाठी नियुक्त केले होते. शाळेत येणाऱ्या मुलांसाठी जेवण बनवायचं काम सुनीता देवी करत होत्या. सुनीता यांची या पदावर केवळ तीन हजार रुपयांवर नियुक्ती करण्यात आली होती.
पहिल्या दिवशी शाळेतील मुलांनी जेवण केले पण दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य समाजातील मुलांनी सुनीताने बनवलेले जेवण खाण्यास नकार दिला आणि घरून जेवण आणू लागले. एवढंच नाही तर सुनीता यांच्या नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ग्रामस्थांनी शाळा गाठून सुनीताला या पदावरून हटवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सुनीता यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की, सर्वसामान्य समाजातील मुलांच्या पालकांनी तिचा इतका अपमान केला की, ती पुन्हा नोकरीवर जाण्याचे धाडस करू शकली नाही.