"मुस्लीम खातात आणि मुलं जन्माला घालतात" ; भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच राजकीय पक्षांच्या एकमेकांवर टीका करण्याची पातळी देखील घसरत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असेच एक वक्तव्य समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री बलदेवसिंग औलख यांनी मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलच तापले आहे.
उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री औलख मंगळवारी म्हणाले की , मुस्लिम समुदायाला फक्त मुलं कशी जन्माला घालायची हेच माहित आहे. पत्रकारांनी त्यांना एमआयएम नेते गुफरान नूर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना "मुस्लीम आधीच मुलं जन्माला घालत आहेत. त्यांना कोण रोखतंय? ते फक्त खातात आणि मुलं जन्माला घालतात. त्यांना त्यांच्या मुलांनी चांगल्या संस्थांमध्ये शिकावे आणि प्रगती करावी, असे वाटत नाही," असं मंत्री औलख म्हणाले.
दरम्यान मंत्री ओखला यांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. एमआयएमचे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे म्हणाले होते. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नूर यांनी स्पष्टीकरण देत 'हे माझं वैयक्तिक मत होतं के. आणि त्यात मी काहीही चुकीचे बोललो नाही," असं ते म्हणाले होते.