TRP SCAM : अर्णब गोस्वामीला अटक होणार?

नाईक आत्महत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या अर्णब गोस्वामीवर पुन्हा एकदा वेगळ्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.;

Update: 2020-12-29 02:50 GMT

वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याच्या कोठडीमध्ये वाढ करण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या अर्जात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. पार्थो दासगुप्ता याच्या चौकशीतून मह्त्तवाची माहिती मिळाल्याचा दावा करत पोलिसांनी या प्रकरणात पहिल्यांदाच अर्णब गोस्वामीचे नाव घेतले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी याने पार्थो दासगुप्ताला लाखो रुपये दिल्याचे पुरावे मिळाले असल्याचे पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटले आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीलाही या प्रकरणी अटक होऊ शकते का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अर्णब गोस्वामीने 2017मध्ये रिपब्लिक टीव्ही लाँच झाल्यापासून टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता याला पैसे दिल्याचा पोलिसांना संशय आहे. कोर्टाने दासगुप्ता याची कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. अर्णब गोस्वामीने दिलेल्या लाखो रुपयांच्या माध्यमातून दासगुप्ता याने महागड्या वस्तू खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. पार्थो दासगुप्ताची कोठडी संपल्याने पोलिसांनी सोमवारी त्याला किला कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने त्याची कोठडी वाढवून दिली.

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत बार्कच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसह रिपब्लिकच्या सीईओलाही अटक झाली आहे. याप्रकरणात आतापर्यंतक पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. पण गुन्हा दाखल झाल्यापासून पहिल्यांदाच पोलिसांमनी अर्णब गोस्वामीचे नाव घेतल्याने आता अर्णबलाही याप्रकरणी अटक केली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News