बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) ५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अंदाज वर्तवला होता. त्यानुसार बुलढाण्यात अर्धा तास जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पीकांना धोका निर्माण झाला आहे. तर मार्चच्या (March) सुरुवातीलाच उकाड्याने हैराण झालेल्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खरीप हंगाम काढणीला आला असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्यापाठोपाठ या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, तसेच आंबा, फळे व पालेभाज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यापार्श्वूमीवर शेतकरी बांधवांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. शिवाय या अवकाळी पावसामुळे सर्दी, खोकला आणि ताप सारख्या आजार पसरण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.