शिक्षणाच्या माहेरघरी शिक्षणाचा घात नको : पुणे विद्यापीठ शुल्कवाढीविरोधात बाबा आढाव आक्रमक
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. विद्यापीठातील शुल्क दरवाढ हा अन्याय आहे. त्याचबरोबर मोफत शिक्षण मिळाले पाहिजे ही मागणी असायला हवी . विद्यापीठ अनुदान नाही असे म्हणत आहे, यावर काय बोलावे... शुल्कवाढी विरोधात तात्पुरता लढा नसून ही प्रवाहातील वाटचाल आहे. या आंदोलनात मी सहभागी असेल, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी साकेले.
११ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन केले जाणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील संविधान स्तंभ येथे शुल्कवाढी विरोधात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि कायदेतज्ज्ञ ऍड. असीम सरोदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थी, विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी शुल्कवाढीविरोधात मत व्यक्त केले.
कोरोनाचे कारण देत शुल्कवाढ केली असल्यास चुकीचे आहे. कोणत्या आधारे शुल्कवाढ केली हा प्रश्न आहे. याची कारणं शोधली पाहिजे. विद्यापीठ हे कमाई करण्याचे साधन नसून त्याचे बाजारीकरण करण्याचा निषेध करायला हवा. शुल्कवाढ हे षडयंत्र आहे का हे तपासले पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकताच येणार नाही अशी व्यवस्था आहे. विद्यापीठाच्या बाबतीत सुद्धा शुल्क निर्धारण समिती असावी. शुल्कवाढ चुकीची नसेल तर विद्यापीठ स्पष्ट का करत नाही , अन्यथा चुकीची असल्यास मान्य करायला पाहिजे. अहिंसक पध्दतीने रस्त्यावर लढाई झाली पाहिजे, आम्ही सोबत आहोत. असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.