छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे १९ एप्रिल रोजी विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती व्हावी आणि अग्निशमन दलात असणारी अत्याधुनिक उपकरणे जवळून बघता यावीत, या सकारात्मक हेतूने मुंबई अग्निशमनदलातर्फे विविध ठिकाणी विशेष जनजागृती प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात फायर रोबोसह वॉटर मिस्ट, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, रेस्क्यू ट्रायपॉड स्टॅन्ड, कॉम्बिनेशन टूल यासारखी अत्याधुनिक व महत्त्वाची उपकरणे ठेवण्यात आली. त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाचा इतिहास आणि कर्तव्ये याबाबत देखील माहितीपूर्ण फलक या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले. हे जनजागृती प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणासोबतच कुर्ला व मालाड येथे देखील आयोजित करण्यात आले, असेही मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो. तसेच दरवर्षी १४ ते २० एप्रिल यादरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. याच अनुषंगाने यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी जनजागृती पर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.