शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यासाठी भाजप आमदाराचे बॅनर घालून अनोखे आंदोलन
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्यादिवशी देखील विरोधकांची सुरुवात आंदोलनानेच झाली. यामध्ये भाजपचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांनी बॅनर घालून अनोखं आंदोलन केलं.
आघाडी सरकारचा धिक्कार असो अशी घोषणा देत दादाराव केचे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. राज्यभरात कोव्हीड काळात शेतकऱ्यांना जो अधिकच्या वीज बिलाचा त्रास सहन करावा लागत आहे तोच प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही भेडसावत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे ही त्यांची पहिली मागणी होती.
यांच्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा आणि आष्टी या नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींना फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा योजना पुरवणे ही त्यांची दुसरी मागणी होती. तर आर्वी नगरपरिषदेला 4 जून 2019 ला फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या 25 कोटींच्या निधी प्रस्तावाला मंजुरी द्यावी ही त्यांची तिसरी प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्री आज विधानसभेत उपस्थित राहणार असल्याने हे बॅनर घालून आज आंदोलन केले असल्याचं त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.