जालना : राजकिय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात मात्र मी सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखं वागतो म्हणून सातत्याने ४० वर्ष एकही निवडणूक न हारता निवडून येतो असं सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या सतत विजयी होण्याचं रहस्य उघड केलं.आज भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जालना जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमांत बोलत होते.
निवडून आल्यानंतर अनेक नेत्यांच्या वागणुकीत आणि राहणीमानात बदल होतो असं सांगत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून हातात कुणाच्यातरी सांगण्यावरून हिरा, पन्ना आणि निलम या अंगठ्या घातल्या पण तरीही त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचं दानवे म्हणाले.
भागवत कराड मंत्रीमंडळात नवीन चेहरा असल्यानं त्यांच्या मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असं सांगत मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालो, माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही असं दानवे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मला कोळसा खातं मिळाल्यानं सकाळीच उठून मी तोंडावरून हात फिरवून तोंड काळं तर झालं नाही ना हे पाहतो असं सांगत मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नसल्याचं त्यांनी ठासून सांगितलं.
माझं मंत्रीपद जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्याचां टोला देखील त्यांनी विरोधकांना हाणला.लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिलं नसतं तर माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.
२०१९ च्या निवडणुकीत मी साडेतीन लाख मतांनी निवडून आलो असं सांगत त्यांनी निकालाच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र घेण्याआधी बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्याला कसे चिमटे काढले याचा किस्सा सांगितला तसेच आयुष्यात अशा काहाण्या खूप झाल्यात असं सांगत भाजप नेते बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टोलेबाजी करत त्यांचा समाचार घेतला.