कल्याणमध्ये आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या पंच्याहत्तरी निमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी सांगितले की, भाजप आणि मनसे यांची युती होणे शक्य नाही. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठीची आहे. त्यामुळे अशी संकुचित भूमिका घेणे भाजपला परवडणारे नाही. रिपब्लिकन पक्ष भाजपच्या सोबत असल्यावर मनसेची काय गरज आहे.
दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई एकत्र निवडणूक लढविणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र येत्या निवडणूकांमध्ये भाजप आणि रिपाई एकत्र निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी रिपाई भाजपकडे काही जागा मागणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजप शिवसेना पुन्हा कधीही एकत्र येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा प्रकारचे वाद करून चालणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी राज्य सरकारने सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणे अयोग्य आहे. शिवसेनेने देखील अलेकदा अशी वक्तव्ये केली आहेत. राणे हे शिवसेनेतच होते. त्यामुळे त्यांचीदेखील भाषा तशी आहे. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखे नव्हते. केंद्राकडुन येणाऱ्या पैशातून राज्य सरकारन राज्याचा विकास केला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.