उद्धवजी, एक मार्ग निवडा: रवींद्र पोखरकर

प्रबोधनकार खरंच ग्रेट होते,आहेत आणि राहतील.खरंतर तुम्ही द्विधा मनस्थितीत राहण्याऐवजी त्यांच्याच वाटेवरून चालायला हवंय.महाराष्ट्रातील सुजाण जनतेचीही तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे, लेखक रवींद्र पोखरकर यांनी मांडलेली सडेतोड भूमिका..;

Update: 2023-03-27 05:05 GMT

प्रबोधनकार खरंच ग्रेट होते,आहेत आणि राहतील.खरंतर तुम्ही द्विधा मनस्थितीत राहण्याऐवजी त्यांच्याच वाटेवरून चालायला हवंय.महाराष्ट्रातील सुजाण जनतेचीही तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे, लेखक रवींद्र पोखरकर यांनी मांडलेली सडेतोड भूमिका..

थोडे प्रबोधनकार,थोडे बाळासाहेब,थोडे सावरकर अशी खिचडी करत भूमिका घेताना तुमची अडचण होत जाणार उद्धवजी.कोणता तरी एक मार्ग निवडा आणि त्यावर ठाम राहा.सावरकर तुमचं दैवत असू शकेल,पण म्हणून राहुल गांधींनाही तसंच का वाटावं ? हा देश ज्यांना राष्ट्रपिता मानतो आणि साऱ्या जगात ज्यांना आजही आदरपूर्वक वंदन केलं जातं,जे काँग्रेससाठी अर्थातच पूजनीय होते अशा महात्मा गांधींच्या खुनाचे सूत्रधार असल्याचा आरोप सावरकरांवर होता.नथुराम,आपटे,बडगे आदी सगळ्यांच्या सोबत सावरकरही अटकेत होते.तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी २७ फेब्रुवारी १९४८ रोजी पंतप्रधान पंडित नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की,'बापूंच्या हत्येच्या तपासाबद्दल मी रोज सविस्तर माहिती घेत असतो.आत्तापर्यंत जो पुरावा समोर आला आहे त्यानुसार सावरकरांच्या सूचनेनुसार काम करणाऱ्या (डायरेक्टली अंडर सावरकर,असे पटेलांचे शब्द आहेत.) हिंदू महासभेतील एका अतिरेकी विचारांच्या गटाने बापूंच्या हत्येचा कट अमलात आणला.वल्लभभाई पटेलांना गांधी हत्येत सावरकरांच्या सहभागाचा कोणताही पुरावा सापडला नसता तर त्यांनी सावरकरांना या खटल्यात आरोपी करणे तर सोडाच,अटकही होऊ दिली नसती.पूर्वग्रह दूषितपणाने ते कधीच कारभार करीत नसत.श्यामाप्रसाद मुखर्जीना लिहिलेल्या पत्रातही त्यांनी हे सर्व सविस्तर लिहिलेले आहे.पुढे न्यायालयानेही सावरकरांना निर्दोष मुक्त केलेलं नाही तर माफीचा साक्षीदार झालेल्या बडगेने जी माहिती न्यायालयाला दिली ती पूर्ण विश्वासार्ह असली तरी त्याची अधिक पुष्टी करणारे ठोस पुरावे तपास यंत्रणेने सादर न केल्याने सावरकरांची मुक्तता करण्यात येत आहे,असं न्यायालयाने म्हटलं.

माफीचा साक्षीदार झालेल्या बडगेने न्यायालयाला काय सांगितलं होतं ? तर "नथुराम व आपटे या दोघांसोबत मीही मुंबईतील शिवाजी पार्क भागातील सावरकर सदनात १४ व १७ जानेवारी १९४८ या दोन्ही दिवशी गेलो होतो.त्यापैकी दुसऱ्यांदा म्हणजे १७ जानेवारीला सावरकरांना भेटून नथुराम व आपटे खाली आले तेव्हा 'यशस्वी होऊन या' असं सावरकर त्यांना म्हणाले हे मी स्वतः ऐकलं.त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागल्यावर 'गांधींची आता शंभर वर्षे भरली आहेत असं आपटे मला म्हणाला' असंही बडगेने सांगितलं.हे सगळंच काय दर्शवतं ?

राहुल गांधी कशासाठी अशा माणसाचा आदर करतील ? असो..

तुम्ही मालेगावात म्हणालात की सावरकरांमुळे स्वातंत्र्य लाभलं ! हे तर अचाट आहे.अंदमानात गेल्यापासून ते पुढे देश स्वतंत्र होईपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांचं कोणतं योगदान आहे हे देखील एकदा सांगून टाका.अंदमानातून दहा वर्षांनी बाहेर - मग स्थाबद्धता-मग त्यातूनही बाहेर पडल्यावर केवळ मुस्लिम द्वेष,फाळणीचं राजकारण आणि ब्रिटिशांशी सहकार्याची भूमिका हेच सावरकरांनी केलंय."तुम्हाला आम्ही स्वातंत्र्यवीर मानलं होतं पण आता तुम्ही तसे अजिबातच राहिला नसून जे काही करता आहात त्यामुळे उलट तुम्ही स्वातंत्र्याचे शत्रू झालेला आहात असं अतिशय दुःखाने म्हणावंसं वाटतं" असं आचार्य अत्र्यांनी १९४१ साली उद्विग्न होऊन 'नवयुग' मध्ये लिहिलं आहे.इतक्या टोकाचं लिहायला अत्रे वेडे होते काय उद्धवजी ?

ते सगळं सोडा..आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी काय लिहून ठेवलंय ते तरी पहा,'वासुदेव बळवंताचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय अथवा सावरकरांच्या अभिनव भारतचे दीक्षित काय,एकजात सारे ब्राम्हणच होते.खरा हिंदुस्थान शहरात नसून खेड्यापाड्यात आहे.शेतकरी-कामकऱ्यांचा तो कोट्यावधी बहुजन समाज उठवल्याशिवाय या शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळी फुकट आहेत,हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनवण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे.गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरदस्त शक्ती बनली."

याव्यतिरिक्तही अगदी सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथातील अनेक मुद्द्यांवर,त्यांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेवर प्रबोधनकारांनी टीका केलेली आहे.खूपच मोठा लेख होईल म्हणून ते सगळे दाखले इथे देणे टाळतो.पण तुम्ही ते वाचले नसतील तर वाचायला हवेत.तुम्ही चापेकरांचा कालच्या भाषणात उल्लेख केलात,त्याविषयीही खूप लिहिता येईल.त्यांनी फाशी जाण्याआधी स्वतःच लिहून ठेवलंय की रँड साहेबाने धर्मद्रोह केला म्हणून आम्ही त्याला मारला अन्यथा तो अधिकारी माणूस म्हणून चांगला होता ! आणि रँडने धर्मद्रोह केला म्हणजे काय केलेलं तर ज्या प्लेगच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याची खास नियुक्ती करण्यात आली होती ते काम करताना लोकांचं सहकार्य मिळत नाही म्हणून त्याने प्लेगचे रुग्ण शोधण्यासाठी आणि त्यांना गावाबाहेरच्या कॅम्पसमध्ये हलवण्यासाठी सक्ती केली.त्याच्या सैनिकांनी घराघरात शिरून लोकांनी दडवून ठेवलेले रुग्ण शोधले,ते करताना माजघर-देवघरातही शिरले,त्यात कधी लोकांशी धक्काबुकीही झाली,कधी महिलांनाही धक्का लागला असेल, हा रँडचा धर्मद्रोह ! उद्धवजी,आता करोनाकाळात तुम्ही मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या अनेकांना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला.त्यातल्या एखाद्याने चवताळून एखाद्या पोलिसांचा खून केला असता तर त्या खून करणाऱ्याला आपण हुतात्मा मानलं असतं काय ? चापेकरांनी रँडचा खून करण्यात देशकार्य काहीही नव्हतं.आणि महत्वाचं म्हणजे हे त्यांनी स्वतःच लिहून ठेवलंय.सावरकरांनी ज्याप्रमाणे टोपण नावाने (चित्रगुप्त) अंदमानातील हालअपेष्टांविषयी उद्दात्तीकरण करणारं लिखाण स्वतःच केलं तसंच चापेकरांनी रँडचा खून करण्याच्या कृतीला त्यांच्या जातबांधवानी नंतर देशकार्याचा मुलामा चढवला ! असो..

मुद्दा हा आहे की प्रबोधनकार खरंच ग्रेट होते,आहेत आणि राहतील.खरंतर तुम्ही द्विधा मनस्थितीत राहण्याऐवजी त्यांच्याच वाटेवरून चालायला हवंय.महाराष्ट्रातील सुजाण जनतेचीही तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे.या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही त्या वाटेवरून प्रवास सुरु केलाय असं वाटल्यानेच माझ्यासारखे पुरोगामी विचारांचे असंख्य लोक खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिलेत.शेंडी-जानव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही असं म्हणताना प्रत्यक्षात मात्र आपल्या काही वक्तव्यांतून किंवा भूमिकांतून 'त्या' हिंदूत्वालाच तर बळ मिळणार नाही ना,याचा विचार करायला हवाय साहेब..

बस..इतकंच सुचवायचं होतं..

Tags:    

Similar News