भाजपचा राजकीय अड्डा उध्वस्त होण्याच्या भीतीनेच पत्र पाठवण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक राज्याच्या विधीमंडळात मंजूर करून घेतल्याच्या विरोधात भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यावरून राज्यात विद्यापाठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भाजयुमोने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना 2 हजार पत्र पाठवले होते. त्यावर प्रत्युत्तर देतांना भाजपचा राजकीय अड्डा उध्वस्त होण्याच्या भीतीनेच पत्र पाठवण्याचे षडयंत्र सुरू आहे, असा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला.;

Update: 2022-01-10 12:23 GMT

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. त्याला विरोधी पक्ष भाजपने जोरदार विरोध केला. तर विद्यापीठांना राजकीय अड्डा बनवण्यासाठी, आर्थिक लाभ घेण्यासाठी आणि उच्चपद बहाल करून जमिनी लाटण्यासाठी विद्यापीठामध्ये स्वतःसाठी प्र कुलगुरू हे महत्वाचे पद निर्माण करण्यासाठी हे विधेयक मांडले असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या करण्यासाठीच हे पद निर्माण केला असल्याचा गंभीर आरोप भाजयुमोचे राजसिंह राजे निंबाळकर यांनी केला. तसेच या विधेयकाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना 2 हजार पत्र व एसएमएस पाठवण्यात आले होते. त्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.

भाजयुमोने पाठवलेल्या पत्रांना उत्तर देतांना सामंत म्हणाले की, विद्यापीठ हे मला राजकीय अड्डा बनवायचा आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. पण राज्यपालांचा सन्मान ठेऊन सांगतो की, पुर्वी जे सदस्य सिनेटवर गेले आहेत. त्यात राजकीय व्यक्ती आहेत, हे सिध्द करू शकलात तर तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. मात्र स्वताचे राजकीय अड्डे कदाचीत उद्ध्वस्त होतील म्हणून युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून पत्र पाठवण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.

पुढे सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात वंचित घटकाला बरोबर घेऊन विद्यापीठात काम झाले पाहिजे. तेच आम्ही करत आहोत. मात्र भाजपाचे लोक त्यालाच विरोध करतात. त्यामुळे भाजपाचा विरोध मला नाही तर मोदी साहेबांना आहे. कारण कुलगुरू नेमण्याची पध्दत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली. पण त्यावरून होणारा विरोध मला नाही तर केंद्राला आहे, असा टोला सामंत यांनी भाजयुमोच्या आंदोलनावरून लगावला. 

Tags:    

Similar News