धक्कादायक! जातपंचायतीचा कौटुंबिक भांडणात हस्तक्षेप करत वाळीत टाकण्याचा प्रकार
जातपंचायतीचा कौटुंबिक भांडणात हस्तक्षेप करत वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत बाप-लेकींने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे.
सोलापुरात जातपंचायतीचा अन्यायकारक कारभार समोर आला आहे. शरणीदास भोसले नामक व्यक्तीच्या कौटुंबिक वादात हस्तक्षेप करून शरणीदास यांना जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार घडला आहे..
शराणीदास भोसले हे मूळचे सोलापूरचे असून ते त्यांच्या बायकोपासून वेगळे राहत आहेत. वडिलांसोबत लहानपणी ते सांगलीला गेले. 2008 मध्ये शराणीदास यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी, दोन मूले झाली. काही वर्षानंतर पती-पत्नीत वाद सुरु झाला. त्यांनी गोंधळी समाज जातपंचायतीमध्ये न्याय मागितला. 2018 मध्ये जात पंचायतीने पत्नीपासून लांब राहण्याचा निर्णय दिला. हा निर्णय शराणीदास यांना मान्य न केल्याने त्यांना 2018 पासून त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कौटुंबिक भांडण मिटवण्यासाठी तसेच परत समाजात घेण्यासाठी त्यांच्याकडे पंचांनी 2 लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शरणीदास यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांच्या भावाने भीतीपोटी भेटु देखील दिले नाही. तसेच, शरणीदास यांच्या मुलीनेसुद्धा जातपंचायतीविरुद्ध आवाज उठवला आहे.
जातपंचयत कायमची बरखास्त करण्यात यावी अशी मागणी देखील या बाप-लेकींनी शासनाकडे केली आहे. तसेच शरणीदास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात एमआयएमडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.