पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर दारुच्या नशेत भरधाव ट्रक चालवणाराने दोन बालकांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर मोरचुंडी येथे शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार होते. यावेळी याच ट्रकने एका दुकानाला धडक दिली. त्यामध्ये त्या दुकानाचे पत्रे तुटून मोठे नुकसान झाले. यावेळी घाईघाईने ट्रक मागे घेत असताना एक जण गंभीर जखमी झाल्याची घटनाही घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हा मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये-जा करीत असतात. शनिवारी दुपारी 3.17 मिनिटांनी भरधाव ट्रक जव्हारहून नाशिकच्या दिशेने जात होता. त्यावेळी चालक नशेत होता. तर नशेत असलेला ड्रायव्हर ट्रक हयगयीने चालवीत होता. यावेळी विरुद्ध दिशेला खेळत असलेल्या दोन बालकांना ट्रकने चिरडत झाडाला धडक दिली. त्यानंतर आरोही नकुल सोनार वय 5 वर्ष, पायल भालचंद्र वारघडे वय 9 वर्षे या दोन्ही मुली जागीच ठार झाल्या. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचीही घटना घडली.
चालकांला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध नोंदविता स्थानिकांनी रस्ता रोको सुरू केला आहे. दरम्यान वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली आहेत.