जागतिक रंगभूमीवरील या श्रेष्ठ नाटककार

आज १९ मे. विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. भारतीयच नव्हे तर जागतिक रंगभूमीवरील या श्रेष्ठ नाटककाराला विनम्र अभिवादन केले आहे अभ्यासक विकास मेश्राम यांनी...

Update: 2021-05-19 07:13 GMT

विजय तेंडुलकर जन्म : कोल्हापूर, ६ जानेवारी १९२८; मृत्यू : पुणे, १९ मे २००८ हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते.

त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे.

लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याच प्रमाणे तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.

मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.तेंडुलकरांचा लेखन क्षेत्रातला उदय हा साठ-सत्तरच्या दशकातला आहे. त्या काळात असंतोषाचं वातावरण होतं. याच वातावरणाची निरीक्षणं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडली.

"६०-७०च्या काळाची पार्श्वभूमी नसती तर कदाचित तेंडुलकर नावाची दंतकथा जन्मालाच नसती आली. ते दशक होतं अनादराचं आणि प्रस्थापितांविरोधात बंड पुकारण्याचं. त्या काळातली पत्रकारिता आणि लिखाण हे दोन्ही बदलू लागलं होतं. हाच बदल तेंडुलकरांच्या लिखाणातून जाणवतो," तेंडुलकर हे पत्रकार आणि लेखक दोन्ही होते. "त्यांच्यासाठी पत्रकारिता आणि लिखाण हे व्यवसाय नव्हते, तर या दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनाचं ध्येय होत्या," "त्यांची नाटकं त्या काळातील परिस्थितीवर भाष्य करणारी आहेत. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक ६०च्या मध्यात येणं आणि गिधाडे, घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर हे ७० च्या दशकात येणं हा काही योगायोग नाही. या सर्व नाटकांमधून नात्यांचा आणि व्यवस्थेचा ऱ्हास कसा होत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं,"

तेंडुलकरांआधी मराठी रंगभूमीवर येणारी नाटकं ही वेगळ्या स्वरूपाची असायची. नाटक या माध्यमातून काही संस्कार घडावेत असा बऱ्याच नाटककारांचा आग्रह असायचा. पण तेंडुलकरांनी या गोष्टीला एक धक्का दिला. समाजातल्या कुरूप गोष्टी देखील त्यांनी दाखवण्यास सुरुवात केली,"

स्वातंत्र्योत्तर काळातली पिढी आशावादी, स्वप्नाळू आणि नीतीमूल्यांची चाड बाळगणारी आहे अशी समजूत होती. पण तेंडुलकरांनी त्यांचा हा चेहरा खरवडून काढला," त्यांनी निवडलेल्या वेगळ्या विषयांमुळे आणि मांडणीमुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाले. तेंडुलकर हे नेहमी वादग्रस्त विषयाला हात घालत असा आरोप त्यांच्यावर केला जात असे. , "त्यांनी वादग्रस्त विषय मुद्दामहून हाताळले नाहीत. त्यांना जे लिहायचं आहे ते वादग्रस्त म्हणून देखील त्यांनी टाळलं नाही. त्यांची जीवनाबद्दलची दृष्टी व्यापक होती. ज्यांची जीवनाची दृष्टी त्यांच्याइतकी व्यापक नाही त्यांना ते वादग्रस्त वाटू शकतात." "संघर्षाशिवाय नाट्य निर्माण होत नसतं. तेंडुलकर नेहमी मोठा संघर्षबिंदू पकडायचे आणि त्यावर नाटक लिहायचे. ते प्रेक्षकांना धक्का द्यावा किंवा त्यांना चांगलं वाटावं असा विचार करून नाटक लिहित नव्हते, तर जीवनातलं वास्तव दाखवण्यासाठी नाटक लिहित असत..

"आपल्या नाटकातून त्यांनी जगण्याचे पेच काय आहेत याचं दर्शन घडवलं, पात्रांच्या आयुष्यात असलेलं नैतिक अनैतिकतेचा संघर्ष त्यांनी दाखवून दिला,खऱ्या आयुष्यात एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशी वागू शकते याचा विचार करूनच त्यांनी आपली पात्रं रंगवली. त्या पात्रांच्या मूळ प्रेरणा या रोजच्या जगण्यातील असत," पल्लेदार नाही तर थेट मनाला भिडणारे संवाद"त्यांची पात्रं सहज होती. त्यांची भाषा कृत्रिम नव्हती. नाटकातले संवाद पल्लेदार नसत. त्यामुळे ती पात्रं आणि भाषा प्रेक्षकांना जवळची वाटत असे, असं असलं तरी पात्रांच्या भाषेत वजन असायचं,"

जसं भाषेचं व्याकरण असतं तसंच नाटकाचं देखील व्याकरण असतं, नाटकाची देखील भाषा असते. तेंडुलकरांची त्यावर हुकूमत होती. हे माध्यम दृश्य आणि श्राव्य आहे त्याचा विचार करून ते लिहीत असत. नाटकांच्या निमित्ताने त्यांचा सहवास मला मिळाला, त्यावेळी हे बारकावे लक्षात आले,"आधी परिणामाचा विचार मग मांडणीतेंडुलकरांशी बोलल्यानंतर आणि पुन्हा नव्याने त्यांच्या नाटकांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ते परिणाम काय साधायचा हे आधी ठरवत आणि मग मांडणी करत..

"तेंडुलकरांच्या नाटकामुळे हिंसा पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर आली. मराठी प्रेक्षकांसाठी नाटक ही महत्त्वाची गोष्ट होती. कथा, कादंबरी आणि पुस्तक हा वैयक्तिक अनुभव असतो. पण नाटक हा सामाजिक सोहळा असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं नटून-सजून हा सोहळा अनुभवण्यासाठी जात. या परंपरेला तेंडुलकरांनी शह दिला. जेव्हा प्रेक्षक नाटकाला येत तेव्हा तेंडुलकर त्यांना आरसा दाखवत असत,"

"असं काही आमच्यात घडत नाही किंवा आमचं आलबेल आहे असं असं मानणाऱ्या दुटप्पी, दांभिक वर्गासमोर तेंडुलकर आरसा आणून ठेवतात. त्यांच्यातलीच हिंसा दाखवून प्रेक्षकाला उघडानागडा करतात. याचा परिणाम म्हणून प्रेक्षक चिडतो,"

"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता.

एकांकिका - अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका; समग्र एकांकिका (भाग १ ते ३)

कथा - काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे.

कादंबरी - कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज.

चित्रपट पटकथा - अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश, उंबरठा, कमला, गहराई, घाशीराम कोतवाल, चिमणराव, निशांत, प्रार्थना, २२ जून १८९७, मंथन, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू, शांतता कोर्ट चालू आहे, सामना, सिंहासन .

टॉक शो - प्रिया तेंडुलकर टॉक शो.

दूरचित्रवाणी मालिका - स्वयंसिद्धा.

नाटके - अजगर आणि गंधर्व, अशी पाखरे येती, एक हट्टी मुलगी, कन्यादान, कमला, कावळ्यांची शाळा, कुत्रे, गृहस्थ, गिधाडे, घरटे अमुचे छान, घाशीराम कोतवाल, चिमणीचं घर होतं मेणाचं, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, छिन्न, झाला अनंत हनुमंत, त्याची पाचवी, दंबद्वीपचा मुकाबला,देवाची माणसे, नियतीच्या बैलाला, पाहिजे जातीचे, फुटपायरीचा सम्राट, भल्याकाका, भाऊ मुरारराव, भेकड, बेबी, मधल्या भिंती, माणूस नावाचे बेट, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, मी जिंकलो मी हरलो, विठ्ठला, शांतता! कोर्ट चालू आहे, श्रीमंत, सखाराम बाईंडर, सफर, सरी गं सरी.

नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी.

बालनाट्ये - इथे बाळे मिळतात, चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, मुलांसाठी तीन नाटिका, राजाराणीला घाम हवा..

भाषांतरे : आधेअधुरे (मोहन राकेश), चित्त्याच्या मागावर, तुघलक (गिरीश कर्नाड), लिंकन यांचे अखेरचे दिवस (व्हॅन डोरेन मार्क), लोभ असावा ही विनंती (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर), वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या "स्ट्रीटकार नेम्ड डिझायर'चे भाषांतर), पाच पाहुण्या - पाच विदेशी कथांचा अनुवाद..

ललित - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर, हे सर्व कोठून येते? ही त्यांची ग्रंथ संपदा.

त्यांना अनेक पुरस्कार मिळाले या मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.

आपल्या लेखनातील विषयी ते म्हणतात ,"...सन्मान घडण्यासारखे मी नक्की काय केले आहे किंवा माझ्या हातून घडले आहे ते शोधतो आहे.एवढे खरे की, मी जे जगलो आणि माझ्याभोवती इतरांना जगताना पाहिले त्याच्याशी लिहिताना प्रामाणिक राहिलो.नाटकासारखे प्रेक्षक-सापेक्ष, रंजनप्रधान आणि बाळबोध माध्यम हाताशी असूनही माझ्या काळातल्या जगण्यातले पेच, गोंधळ आणि गुंतागुंत प्रेक्षकांसाठी सरळ, सोपी आणि खोटी करून मी मांडली नाही. मी जे लिहिले ते काही वेळा माझ्या समाजाला धक्कादायक आणि प्रक्षोभक देखील वाटले आणि त्याचे प्रायश्चित्त मला त्यांनी वेळोवेळी दिले, ते मी घेतले आणि लिहिल्या कृतीचा पश्चात्ताप कधी केला नाही.परंतु विचार करतो तेव्हा असे लक्षात येते की, यात माझे शौर्य नव्हते, धैर्य नव्हते, मलाही संगती न लागणारा एक हट्टीपणा होता. कुणी नको म्हटले की तेच करण्याचा माझा जुना स्वभाव आहे.

Tags:    

Similar News