एका कुटुंबाने तृतीयपंथी व्यक्तीला बक्षीसी दिली नाही म्हणून त्यांच्या 3 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तृतीयपंथी व्यक्तीने घरातून त्या बाळाचे अपहरण केले आणि तिला खाडीजवळ जिवंत पुरल्याचे उघड झाले आहे. या क्रूर हत्येने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील कफ परेड येथे चितकोटे कुटुंबीय राहतात. बाळाला आशीर्वाद दिले पैसे आणि साडी दिली नाही याचा राग आल्याने त्याच परिसरात राहणाऱ्या तृतीयपंथीयाने त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला खाडीत जिवंत पुररुन टाकले. याप्रकरणी तृतीयपंथीय कन्हैया चौगुले (कन्नू, वय -३०) आणि त्याचा साथीदार सोनू कांबळे (वय- २२) यांना अटक केली आहे. आर्या असे त्या मुलीचे नाव होते.
गुरूवारी संध्याकाळी त्याच भागात राहणारा तृतीयपंथी कन्नू त्यांच्या घरी आला आणि मुलीला आशीर्वाद देत त्याने साडी,नारळ आणि 1110 रुपये मागितले. पण एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे चितकोटे कुटुंबाने त्याला सांगितले. यावरूनच त्यांच्यात वाद झाल्यानंतर कन्नू तेथून निघून गेला. पण या वादाचा राग मनात धरुन त्याने सोनू कांबळेच्या मदतीने मध्यरात्री 3 महिन्यांच्या आर्याचे अपहरण केले. त्यानंतर आंबेडकर नगर भागात खाडी परिसरातील दलदलीत बाळाला जिवंत पुरले. मुलगी घऱात नसल्याचे कुटुबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना त्यांनी कन्नू सोबतच्या वादाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीते त्याने गुन्हा कबूल केला.