उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची मंगळवारी निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने सांगितल्यानुसार, राष्ट्रपतींकडून १९८४ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची निवडणूक आयुक्त पदी नेमणूक केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा १२ एप्रिल रोजी कार्यकाळ पूर्ण झाला होता. तेव्हापासून निवडणूक आयोगाचं एक पद रिक्त होतं.
कोण आहेत अनुप चंद्र पांडेय
१९८४ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी अनुप चंद्र पांडे यांनी यापूर्वी २०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव पदाचा कारभार सांभाळलेला आहे.
अनुप चंद्र पांडे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी बी. टेक ची डिग्री घेतली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी एमबीएची डिग्री सुद्धा मिळवलेली आहे. सोबतच प्राचीन इतिहासात डॉक्टरेट केली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून पांडे यांचा कार्यकाळ जवळपास ३ वर्षांचा असेल तसेच २०२४ दरम्यान ते सेवानिवृत्त होतील.
योगींनी दिली होती मुदत वाढ…
उत्तर प्रदेशच्या सचिव पदाचा कार्यकाळ हा फेब्रुवारी २०१९ मध्येच संपणार होता. पण योगी आदित्यनाथ सरकारने केंद्राच्या सहमतीने पांडेय यांना ६ महिन्यांची मुदत वाढ दिली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस मधून सेवानिवृत्त होण्यापूर्वी पांडेय हे इन्फ्रास्ट्रॅकचर आणि औद्योगिक विकास आयुक्त पदावर होते.
योगी सरकारचे मुख्य सचिव राहिलेले अनुप चंद्र पांडेय नवे निवडणूक आयुक्त
तीन अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्ये सुनील चंद्रा हे मुख्य निवडणूक आयुक्त असून, राजीव कुमार हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. तर नव नियुक्त अनुप चंद्र पांडेय हे पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोआ, मणिपूर आणि उत्तराखंडच्या च्या निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.