देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनप्रकरणी चर्चेत आलेल्या Toolkit प्रकरणात दिशा रवी हिला पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली होती. दिशा रवीला कोर्टाने सोमवारी एक दिवसाची कोठडी दिली होती. त्याआधी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी पोलिसांकडे दिशा रवीचा २६ जानेवारीच्या हिंसाचाराशी संबंध असल्याचे पुरावे मागितले होते. पण असे कोणतेही पुरावे सध्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले होते.
पण तपास सुरू असल्याने कोठडी वाढवण्याची मागणी त्यांनी केली होती. ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या Toolkit प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. या टूलकिटचा संबंध खलिस्तानवादी संघटनेशी आहे आणि दिशा रवी तसेच तिच्या आणखी दोन साथीदारांचा यात सहभाग आहे असा आरोप पोलिसांनी केला आहे. अपूर्ण आणि अर्धवट पुराव्यांच्या आधारावर आपल्याला दिशाला जामीन नाकारता येणार नाही, असे न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी म्हटले आहे. तसेच दिशाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने तिला जामीन नाकारता येणार नाही असेही कोर्टाने म्हटले आहे. दिशाला प्रत्येक एक-एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.