गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार

गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा होणार आहेत.;

Update: 2022-02-12 04:39 GMT

 उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर राज्यातील निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. निवडणूक जवळ येताच राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत होत्या. तर निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. येत्या 14 फेब्रुवारीला उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि गोवा राज्यात मतदान होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी दिग्गजांच्या सभांनी प्रचाराची सांगता करण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तरप्रदेश निवडणूकीत पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी रोजी पार पडले. त्यानंतर उत्तरप्रदेशमध्ये सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर उत्तराखंड आणि गोव्यात सोमवारी एकाच टप्प्यात सर्व मतदान पुर्ण होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर शनिवारी प्रचारसभांमधील तोफा थंडावणार आहेत.

उत्तरप्रदेशसह गोवा आणि उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचार चांगलाच रंगला होता. तर काही वादग्रस्त विधानांमुळे निवडणूकीची चर्चा रंगली होती. त्यामुळे निवडणूकीची रंगत वाढली होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडमधील रुद्रपुर आणि उत्तरप्रदेशमधील कन्नौज येथील प्रचार रॅलीत सहभागी होऊन मतदारांना संबोधित करणार आहेत. तर प्रियंका गांधी उत्तरप्रदेशसह आज उत्तराखंडमध्येही प्रचारसभा घेणार आहेत. तर अमित शहा डेहराडून, धनौल्टी, सहसपुर, रायपुर आणि हरिद्वारमध्ये जनसंपर्क अभियान करणार आहेत. तर योगी आदित्यनाथ प्रचारसभांसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तीनही राज्यात दिग्गजांच्या सभा गाजणार आहेत.

उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी हे निश्चिंत दिसत असले तरी सत्ता राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीत रावत यांची गेल्या निवडणूकीत भाजपाने मोठ्या फरकाने जिंकलेल्या लालकुआं मतदारसंघातून विजयी होण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी डोईवाला विधानसभा क्षेत्रातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन आधीच आपली हार मानली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तराखंडमध्ये सर्वच नेत्यांचा कस लागणार आहे.

गोवा निवडणूकीतही भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आव्हान दिले आहे. त्यातच आम आदमी पक्षाने गोवा विधानसभेत चुरस निर्माण केली आहे. काँग्रेसला सुर गवसण्यासाठी गोव्याची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. त्यातच तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना यांच्यासह स्थानिक गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी झगडणार आहेत. तर गोवा निवडणूकीत भाजप गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

उत्तरप्रदेश निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष आहे. त्यातच भाजपच्या अनेक मंत्र्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने अखिलेश यादव यांनी जोरदार धक्का दिला होता. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महिलांना सोबत घेऊन लडकी हूँ लढ सकती हूँ या अभियानाने वातावरण तापवले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे प्रचाराचा शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

Tags:    

Similar News