पोलिसांच्या जाचाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या?

Update: 2021-09-09 04:37 GMT

एका गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथून समोर आली आहे.आदित्य भोंगळे असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या जाचाला कंटाळून या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप आदित्यच्या नातेवाईकांनी केला आहे.त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह एक तास पोलीस ठाण्यात आणून ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी चौकशी करुन संबंधीतावर गुन्हे दाखल करु असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आदित्य अरुण भोंगळे (वय-१७) असे मृत मुलाचे नाव असून त्याच्यावर बालमटाकळी ता. शेवगाव येथे रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. अजिंक्य महालकर यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आदित्य भोंगळे हा आईसोबत बालमटाकळी येथे शनिवार शेतामध्ये काम करीत होता. त्यावेळी शेवगाव पोलीस ठाण्याच्या चार कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करुन रविवार दुपारी त्याला सोडले. त्यानंतर त्याला पैशाची मागणी करुन त्याच्याकडून 43 हजार रुपये रोख व दोन हजार रुपये फोन पे वरून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. चौकशी दरम्यान आदित्यला मारहाण केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र पुन्हा पोलीस आपल्याला ताब्यात घेतील या भीती पोटी आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्याने मंगळवार रात्री राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचा आरोप आदित्य भोंगळे याच्या आईने केला आहे. मात्र याबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने नातेवाईकांनी बुधवारी दुपारी 2 वाजता मृतदेह शवविच्छेदनानंतर पोलीस ठाण्यात आणून ठेवला. त्यांनी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला.

तेथील तणाव वाढल्याने निरीक्षक प्रभाकर पाटील अतिरीक्त बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य प्रकाश भोसले, पवनकुमार साळवे, शिवसेनेचे तालुकाप्रमख अँड. मगरे, वंचितचे किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, अनिल इंगळे, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष विजय बोरुडे, कैलास तिजोरे, सतिश मगर, कडू मगर, राम अंधारे, विनोद मोहीते, प्रविण भारस्कर, राजू मगर, गौरव मगर, ताराचंद साबळे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.

आदित्यकडे चोरीच्या गाडया असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून माहिती मिळाल्याने इतर दोन जणांना ताब्यात घेतले. दोन आरोपींकडून दोन चोरीच्या दुचाकी व एक गावठी कट्टा हस्तगत केला. मात्र आदित्य कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. मात्र इतर कोणीतरी त्याला तुला पोलिस ताब्यात घेणार असल्याची भिती दाखवल्याने त्याने आत्महत्या केल्याच नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मयताची आई व त्यांचे नातेवाईक यांची पोलिसांबद्दल तक्रार असून त्याची मी स्वत: चौकशी करुन यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करेल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी दिल्यानंतर आई व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशीरा बालमटाकळी येथे आदित्यवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मात्र या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News