टिपू सुलतान वाद पेटला : प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबईतील मालाड येथील मैदानाला टिपू सुलतानचे नाव दिल्याच्या कारणावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तर भाजपने मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यावरून वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मालाड येथील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद चांगलाच रंगला आहे. तर भाजप, बजरंग दलासह उजव्या विचारांच्या संघटनांनी मैदानाला टिपू सुलतानचे नाव देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राज्यात नवा वाद पेटला आहे. हा वाद सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. त्यावरून वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यासाठीच टिपू सुलतान मुद्दा वापरला जात आहे. माझ्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा नाही. मात्र RSS आणि भाजपला मुस्लिमांविरोधात लाट निर्माण करून निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यामुळे राज्यात दंगल होईल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. तसेच जोपर्यंत राज्यात दंगल होत नाही तोपर्यंत आपल्या हातात शासन येणार नाही, हे भाजपला माहिती आहे. त्यांचा जनाधार घटत असल्यामुळेच चत्यांनी टिपूचा वाद पेटवला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच उद्याच्या काळात ही परिस्थिती बदलेल असा आशावाद प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मालाड येथील मैदानाला टिपूचे नाव देण्याचे मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर केले. त्यानंतर बुधवारी बजरंग दल आणि भाजपने जोरदार विरोध करत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. मात्र यानंतर हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपूचे नाव महाराष्ट्रातील मैदानाला दिले जात असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच टिपूच्या नावावरून भाजप आक्रमक होत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.