पुर्वीप्रमाणे तिकीट फाडण्याची एसटी वाहकांवर वेळ ; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
उस्मानाबाद : महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची हक्काची लाल परी म्हणजेच एसटी महामंडळ वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चत असते. गेल्या काही वर्षापासून महामंडळाने ट्रायमेक्स कंपनीसोबत करार करून वाहकांचे काम कमी करत इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आणल्या आणि एसटीचे तिकीट डिजीटल झाले. मात्र, सध्या अनेक बसमधील इलेक्ट्रॉनिक मशिन बंद असल्याने वाहकांना न पुन्हा पुर्वीप्रमाणे तिकीट फाडण्याची वेळ आली आहे. ट्राय मेक्ससोबतचा करार संपल्याने नादुरूस्त मशिन दुरुस्त होत नसल्याची चर्चा असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे.
याबाबत उस्मानाबाद विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती ताम्हनकर यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला, मात्र या विभागातील १०१२ मशिनपैकी ५०० मशिन बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ट्रायमेक्स सध्याही मिशन दुरुस्त करून देत असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र ५० टक्के मशिन बंद असताना त्या पुरेशा आहेत का? असे विचारले असता अनेक फेऱ्या रद्द झाल्याने या मशीन पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. उस्मानाबादसह इतर विभागातही ठराविक मार्गावर तोंडी आदेशाने तिकीट ट्रे वापरण्याची सक्ती केली जात असल्याने सध्याचा बंद फेऱ्यामुळे वाढणारी प्रवाशी संख्या पाहाता ट्रेवर तिकीट देणे म्हणजे वाहकांची प्रचंड दमछाक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.