केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय. विशेष म्हणजे यश संपादन करणाऱ्यांमध्ये एक विद्यार्थी शेतकऱी, एक पत्रकार, तर एक पोलिस कुटुंबातील विद्यार्थी आहेत. संपुर्ण राज्यातून या तिघांवर आता कौतुकाची वर्षाव होत आहे.
नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकरी चक्रधर मोरे यांचा मुलगा शिवहार मोरे याने कोणतेही खाजगी क्लासेस न लावता जिद्दीने अभ्यास केला आणि थेट UPSC परीक्षेत देशातून 649 वा क्रमांक मिळवला आहे.
कोण आहे शिवहार मोरे?
शिवहार हा गुणवंत विद्यार्थी नांदेड तालुक्यातील बाभूळगाव इथला आहे. त्याचे वडील चक्रधर मोरे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्याने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून इंजिनिअरिंग पुर्ण केलं. शिवहारने यापुर्वीही यूपीएससीची परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्याला यश आलं नाही. पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशामुळे खचून न जाता त्याने पुन्हा जिद्दीने यूपीएससीची परीक्षा दिली. त्याच्या या प्रयत्नांमुळेच त्याचा देशात ६४९ वा क्रमांक मिळालाय. त्याच्या या यशामुळे संपुर्ण बाभूळगावची मान अभिमानाने उंचावली आहे.
नांदेडच्याच सुमितकुमार धोत्रे या २६ वर्षीय तरूणाने पहिल्याच प्रयत्नात दिवसरात्र अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत ६६० वा क्रमांक मिळवला आहे.
कोण आहे सुमितकुमार धोत्रे?
मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असलेल्या सुमितकुमार चे वडील हे पत्रकार तर आई शिक्षिका आहेत. लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या सुमितने नांदेड आणि मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. आंबेडकरवादी मिशन, बार्टी या संस्थेची आपल्याला खूप मदत झाल्याची भावना सुमितकुमारने व्यक्त केलीय. सध्या नांदेडमध्ये सुमितकुमार वर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
तर दुसरीकडे रजत कुंडगीर याने ६०२ वा क्रमांक प्राप्त करून युपीएससी परिक्षेत चमकदार कामगिरी केली. रजत हा पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगिर यांचा मुलगा आहे. यश मिळविलेल्या या तिन्हीही विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.