पुणे जिल्ह्यातील तीन धरणं 100 टक्के भरली, नाशिकच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अनेक मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय. पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, दरम्यान या सततच्या पावसामुळे राज्यात अनेक धरणं 100 टक्के क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे.तिकडे कोयना, भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाले आहेत. कोयनाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरण ओव्हर फ्लो झालं असून कोयनाचे सहा दरवाचे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आल्याची माहिती आहे. तर पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, भाटघर धरणं देखील 100 टक्के भरली आहेत.तर पुण्याचे खडकवासला धरण 97 टक्के भरलं आहे. टेमघर धरण हे 99 टक्के भरलं आहे. त्यामुळे दरवर्षी पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांची यंदा पाण्याची चिंता मिटली आहे.दरम्यान खडकवासलामधून 6 हजार 848 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
#Alert | खडकवासला धरणात वेगानं पाण्याची आवक होत असल्याने मुठा पात्रातील विसर्ग ६ हजार ८४८ क्युसेकपर्यंत वाढण्यात आला आहे. विसर्गामुळे पाणी पातळी तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरी नदीकाठ परिसरात सतर्क राहावे.#punerains
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 12, 2021
दरम्यान या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार नसली तरी देख नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.
तिकडे नाशिक जिल्ह्यामधील धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती आहे.तर गंगापूर धरणातून 1 हजार 500, दारणा धरणातून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कडवा धरणामधून 2 हजार 200 तर आळंदी धरणातून 30 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. वालदेवी धरणातून 130 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.