अहमदनगर // ऐन दिवाळीत अहमदनगरमध्ये साडे तीन लाख रुपये किमतीचा 1300 किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरातहून मोठ्या प्रमाणात बनावट खवा खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट खवा विकला जातो आणि या अशाच खव्यापासून मिठाई बनवली जाते. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केल्याने नागरिक सतर्क झाले आहेत तर मिठाई दुकानदार चांगलेच धास्तावले आहेत.
एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याची मागणी वाढते, याचाच गैरफायदा घेत बनावट खवा बनवून विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बनावट खवा हस्तगत करण्यात यश आले आहे.मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट खवा मिळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.
दरम्यान संबंधित व्यक्तीने हा खवा बनावट नसल्याचा दावा केला होता मात्र, या खव्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासल्यानंतरच स्पष्टता येईल.