अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही - शरद पवार
नाशिक// आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम केलं जातं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे काल क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०२१ कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, बीजमाता राहीबाई पोपरे आदी उपस्थित होते.
आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असं पवार म्हणाले. त्यांना त्यांचे हक्क देण्याची, त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. असं पवार म्हणाले. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळेच ते रयतेचे राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे योगदान दिले हे अत्यंत मोलाचे आहे असं पवार म्हणाले.