महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. बंडाची सुरुवात शरद पवारानीं केली असल्याचा इतिहास बाहेर काढला आहे.
'जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. महाराष्ट्रातल्या जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल मेळाव्यात बोलणार', असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले.
'या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवारांनी सुरूवात केली. त्यांनी पहिला पुलोदचा प्रयोग केला 78 साली, तेव्हा काय केलं? त्याआधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरूवात पवार साहेबांकडून झाली शेवट पवार साहेबांकडून झाला', असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.