महाराष्ट्रातल्या विविध भागात वापरण्यात येतात या नैसर्गिक छत्र्या
रेनकोट छत्रीचा शोध लागण्यापूर्वी देखील पाऊस होता. पण त्यावेळी लोक पावसापासून आपला बचाव कसा करायचे? आजही ग्रामीण आदिवासी भागातील लोक कोणत्या नैसर्गिक छत्र्या वापरतात याविषयीची ही दुर्मिळ आणि सखोल माहिती नक्की वाचा…;
रेनकोट छत्रीचा शोध लागण्यापूर्वी देखील पाऊस होता. पण त्यावेळी लोक पावसापासून आपला बचाव कसा करायचे? आजही ग्रामीण आदिवासी भागातील लोक कोणत्या नैसर्गिक छत्र्या वापरतात याविषयीची ही दुर्मिळ आणि सखोल माहिती नक्की वाचा…
पाऊस सुरू झाला की आपल्याला छत्री, रेनकोटची आठवण येते. छत्री हरवण्याचे किस्से तर इतके आहेत की त्यावर अनेक कथा कविता तयार झाल्या. छत्री असतानाही पावसाच्या धारा अंगावर घेत प्यार हुआ इकरार हुआ है, कहने को क्यू ये डरता है दिल म्हणणारे हिरो हिरॉईन आणि धो धो पावसात त्यांचे बरसणारे प्रेम आपण रुपेरी पडद्यावर पाहिले असेल. पावसाने अशाप्रकारे भारतीय चित्रपट, साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राला व्यापून टाकले आहे.
आता असणारे रेनकोट आणि छत्री नसतानाही पाऊस होताच की ? मग त्यावेळी लोक पावसापासून आपला बचाव कसा करायचे ? आताही ग्रामीण आदिवासी भागात लोक नैसर्गिक साधनांचा वापर करत पावसापासून आपला तसेच जनावरांचा बचाव कसा करतात जाणून घेऊयात..
हातात छत्री धरून तुम्ही चालू शकता पण शेतात काम करताना छत्री पकडावी काम करावे असा प्रश्न पडतो. अशावेळी छत्री ही शेतकऱ्याची अडचण होते. कोकण तसेच पावसाच्या प्रदेशात यासाठी इरलं वापरलं जात. इरलं हे पोत्याच्या खोळीच्या आकाराचे परंतु मोठे असते. बांबूच्या कांब्या एकमेकांमध्ये गुंफून त्यावर प्लॅस्टिकचा कागद लावला जातो. डोक्यावर अडकवून पावसापासून आपला बचाव केला जातो. भात रोवणीच्या काळात हे उपयोगी पडते.
महाराष्ट्रातल्या विविध भागातील वापरण्यात येतात या नैसर्गिक छत्र्यामहाराष्ट्रातल्या विविध भागातील वापरण्यात येतात या नैसर्गिक छत्र्या
पावसापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे पोत्याची खोळ. पोत्याचा खालचा एक कोपरा दुसऱ्या कोपऱ्यात खुपसून त्याची खालीपर्यंत उभी घडी मारली की तयार होते खोळ. खोळ डोक्यात घातली की झाला रेनकोट. ग्रामीण भागात डोक्यावर खोळ घेऊन शाळेत जाणारे विद्यार्थी, शेळ्या मेंढ्या राखायला जाणारे शेतकरी आपल्याला दिसतील. इतकेच नव्हे तर जास्त पावसाच्या प्रदेशात पावसापासून शेळ्या मेंढ्यांचा बचाव करण्यासाठीदेखील पोत्याचा चांगला उपयोग केला जातो. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर परिसरात अंगावर पोते बांधलेल्या शेळ्या तुम्हाला प्रत्येक पावसाळ्यात दिसतील.
घोंगडं
मेंढपाळ मेंढ्याचराईसाठी भटकंती करतो. अशा काळात पाऊस झाला तर तो अंगावर घोंगडे घेऊन पावसापासून आपला बचाव करतो. या घोंगड्यावरूनच पूर्वी ग्रामीण लोक पाऊस मोजायचे. घोंगडे गळायला लागले की घोंगडे फुटेपर्यंत पाऊस झाला असे म्हटले जायचे. चिखलातून आपला बचाव करण्यासाठी मेंढपाळ तरवडाच्या झाडाच्या फाट्या अंथरायचे. त्यावर बसून मेंढीच्या, शेळीच्या दुधाचा चहा पिवून रात्र काढतात.
आदिवासी भागात पावसापासून बचाव करण्यासाठी अतिशय कलात्मकतेने नैसर्गिक संसाधनांचा वापर केल्याचे आपल्याला दिसते. अचानकच पाऊस आला की शेतकरी सागवानाचे मोठे पान डोक्यावर धरतो. दोन चार मोठी पाने एकत्र करून त्याच्यामध्ये एक काटी खोचली की झाली छत्री तयार.
आदिवासी पावसाळ्यात अजून एक वस्तू वापरतात जिला रेखी असे म्हटले जाते. आदिवासींनी आपल्या कल्पक बुद्धीतून पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेखीचा शोध लावला आहे. रेखी म्हणजे बांबूच्या कांब्यापासून बनवलेली अशा तऱ्हेची टोपी जिच्यामध्ये सागवानाची पाने लावलेली असतात. रेखी अडकवली की शेतातील काम करताना अडचण येत नाही. रेखी अडकवून भर पावसात भर पावसात शेतात काम करता येते. रेखीत सागवानाची पाने असल्याने डोक्याला देखील उब मिळते. थंडीपासून बचाव होतो.
रेखी बनवतात कशी जाणून घेऊयात
लांब रुंद बांबूच्या कांब्या समतोल गोलाकार ठेवल्या जातात. त्यावर सागवानाची पाने प्लास्टिक कागद बांबूच्या पातळ कांब्यांमध्ये विणला जातो. ही गुंफण केली की सुंदर अशी रेखी तयार होते. यामध्ये अलीकडच्या काळात प्लॅस्टिकचा वापर होतोय पूर्वी ही पूर्णत: नैसर्गिक असायची. झाडांच्या सालीपासून अशा प्रकारचा अंगावर घालण्यासाठी कोट देखील बनवला जातो.