प्रत्येक व्यापाऱ्याला विमा कवच मिळावे ; एबीसीडी असोसिएशनची मागणी
संकट काळात प्रत्येक व्यापाऱ्याला त्याने सरकारकडे भरलेल्या करामधून विमा कवच मिळावे अशी मागणी एबीसीडी असोसिएशन ऑफ बिजनेसच्या वतीने करण्यात आली आहे. व्यापाऱ्यावर आलेल्या संकटामुळे त्याच्यासह त्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावरही संकट येते त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा असं संघटनेनं म्हटलं आहे.
व्यापारी हा राज्याची तिजोरी भरण्यातील महत्त्वाचा घटक असून व्यापारी हा मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतो. परंतु व्यापाऱ्याला त्याच्या बदल्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा प्रशासनातर्फे मिळत नसल्याचा आरोप करत एबीसीडी असोसिएशन ऑफ बिजनेस धुळे यांच्यातर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन करीत व्यापाऱ्यांचा विचार करावा व व्यापाराचे दुर्घटना झाल्यानंतर त्याला त्याच्या टॅक्स मधूनच विमा कवच मिळायला हवे अशी मागणी एबीसीडी असोसिएशन ऑफ बिजनेसने आपल्या निवेदनाव्दारे केली आहे. दुकानाला आग लागणे, त्याचबरोबर पुराचे पाणी शिरल्याने दुकानाचे नुकसान झाल्यास किंवा इतरही नैसर्गिक दुर्घटनेनंतर व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी विमा कवच हे टॅक्सच्या माध्यमातूनच धुळे जिल्हा प्रशासनानेउपलब्ध करून द्यावे असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेजा यांनी म्हटले आहे.
या मागणीबाबत लवकरात लवकर विचार करावा अन्यथा यासाठी व्यापाऱ्यांना मोठे आंदोलन हाती घ्यावे लागेल असं कोटेजा यांनी म्हटले आहे. व्यापाऱ्यांवर एखादं संकट आलं तर त्याने आयुष्यभर त्या व्यवसायासाठी लावलेली त्याची जमापुंजी जाते.
सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संकट काळात ज्या पध्दतीने शासन- प्रशासनाकडून आर्थिक मदत होते तशी व्यवस्था व्यापाऱ्यांनी भरलेल्या टॅक्समधून त्यांना मिळायला हवी. व्यापारी हा केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठीही झगडत असतो. त्याच्या व्यापारे नुकसान झाले तर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर देखील संकट येते याबाबत शासनाने विचार करायला हवा असं मत कोटेजा यांनी व्यक्त केलं आहे.