उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तिसरी घंटा झाली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंधामुळे गेले सात महिने नाटकावर पडलेला पडदा आज दूर झाला आहे. राज्य शासनाने आज 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नाट्यसृष्टीतील हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तिसरी घंटा झाली.
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, "कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती पण जमून गेले. नाटक बघत असताना जशी घंटा वाजायची तशीच घंटा वाजवण्याचा प्रयत्न मी सर्वांच्यासाक्षीने केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी 50 टक्के उपस्थितीची व्यवस्था आहे. सध्या सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, मात्र त्याला धक्का लागून आपल्याकडून चुका होऊन तिसरी लाट येऊ नये याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. सरकार चालवताना हे बंद करा ते बंद करा असे अजिबात आवडत नाही. सगळ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे," असे पवार म्हणाले.