बीड जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या सौताडा येथील रामेश्वर धबधबा वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने धबधब्याचे रौद्ररूप पर्यटकांना पहावयास मिळतं आहे.
मांजरा, सिंदफणा, विंचरणा, बिंदुसरा आणि डोमरी या नद्यांचे उगमस्थान पाटोदा तालुक्यातून होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अंमळनेर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमाभागावर हा धबधबा असून याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करतं आहे. जवळपास 100 फुटांहून हा धबधबा कोसळतो आहे. कोरोनामुळे याठिकाणी निर्बंध असले तरी पर्यटक मात्र इथे गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे असे आवाहन संबधित प्रशासनाने केले आहे.