मुंबई मोठ्याप्रमाणात विविध विकास कामे सुरु आहेत. मुंबईच्या विकासासाठी विकासकामे होणे गरजचे आहे. मात्र ही विकास कामे होत असताना त्याचा नागरिकांना त्रास होता कामा नये, असे मत मुंबईकरांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली विकास कामे ही मुंबईकरांच्या जीवावर बेतली आहेत. कारण या विकास कामांमुळे हवेत धुलीकण मिसळून नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत. मुलुंडमध्ये मॅरेथॉन एवेन्यू परिसरात मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या सिव्हरेज लाईन्स तसेच आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे या परिसरात हवेत धुलीकण मिसळून हवेचा दर्जा खालावला आहे. आतापर्यंत श्वसनाचे विकार होऊन २० जणांना रुग्णालयात दाखल करायची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू देखील झाल्याचं धक्कादायक वास्तव इथल्या नागरिकांकडून सांगितलं जात आहे.
या परिसरात असलेल्या वाहनांवर साचलेल्या धुळीवरून या परिसरात धुळीचा फटका नागरिकांना किती बसत आहे, यावरुन दिसून येत आहे. प्रदूषण नियामक मंडळाकडे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून देखील कुठल्याच उपाययोजना होत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आमदार मिहिर कोटेचां यांनी केली आहे. तरी देखील प्रदुषण नियंत्रण मंडळ याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे. नागरिकरांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या मंडळावर कारवाई कधी होणार असा प्रश्न मुंबईकर विचारु लागले आहेत.