किरण गोसावीची चौकशीसाठी परवानगी मागणारी याचिका एनडीपीएस न्यायालयाने फेटाळली
मुंबई : NCB ने क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, विशेष एनडीपीएस न्यायालयाने NCB ची ही विनंती फेटाळली आहे.
विशेष NDPS न्यायालयाने नमूद केले, की किरण गोसावी JMFC न्यायालय, पुणे यांच्या कस्टडीमध्ये असल्याने योग्य ठिकाणी याचिका दाखल करण्यात यावी.
दरम्यान किरण गोसावीच्या चौकशीसाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही चौकशी करू, असे NCB चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी शुक्रवारी सांगितले होते.
28 ऑक्टोबरला पुणे शहर पोलिसांनी आर्थिक फसवणुकीप्रकरणी किरण गोसावी ताब्यात घेतले होते. तो सध्या पुण्यातील येरवडा कारागृह आहे. मागील मंगळवारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.