बेपत्ता झालेल्या नविद-2 नौकेचे गूढ आणखी वाढले ; बोटीला समुद्रात अपघात झाल्याचा संशय

Update: 2021-11-05 05:23 GMT

रत्नागिरी :  रत्नागिरी जवळच्या जयगड समुद्रातून मागील जवळपास दहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या नौकेचे गूढ आणखी वाढले आहे, या बोटीला समुद्रात अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्र लिहिले आहे. नविद-2 नावाची मच्छिमारी बोट 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली. या बोटीवर एकूण आठ खलाशी होते, त्यातील एकाचा मृतदेह चार दिवसांपूर्वी समुद्रात सापडला होता. 45 वर्षीय अनिल आंबेरकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून, उर्वरित खलाशांचा शोध अद्यापही सुरु आहे. 26 ऑक्टोबरपासून या मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नविद-2 या नौकेवर तांडेलसह आठ खलाशी आहे. मात्र, एका खलाशाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता बोटीविषयी भीती वाढली होती.



 


नौकेशी कोणताही संपर्क होत नसल्याने बोटीच्या मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटींनी युद्ध पातळीवर 'शोध मोहीम' सुरु केली.

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी बोट आहे. दरम्यान कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे असून, त्यांच्यापैकी अनिल आंबेरकर यांचा मृतदेह सापडला आहे.

Tags:    

Similar News