मेलोडी बकवास बंद झाली पाहिजे - सुप्रिया श्रीनेत

Update: 2024-06-18 05:49 GMT

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच जी-७ राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला गेले होते. त्यांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीला केवळ सेल्फी काढण्यासाठी आणि इतर देशांच्या नेत्यांच्या गळ्यात पडण्यासाठी गेले होते असा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एका ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी-७ इटली दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये विचारले आहे की, "नरेंद्र मोदी इटली का गेले होते?"

- भारत जी-७ चे सदस्य देश नाही.

- राष्ट्राध्यक्षांशी कोणतीही मोठी बैठक झाली नाही.

- कोणतेही मोठे करार किंवा समझोते झाले नाहीत.

- कुठेही वक्तव्य किंवा भाषण दिले नाही.

- आणि आता ‘यूक्रेन डिक्लेयरेशन’ पासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे, "ते प्रत्येक नेत्याच्या गळ्यात पडण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गेले होते का?" असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, "किंवा खंडित जनादेशामुळे देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी गेले होते का?" असेही सुप्रिया श्रीनेत यांनी विचारले आहे.

तसेच त्यांनी मोदी यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करत म्हटले आहे की, "हे मेलोडी ( Melodi ) बकवास बंद झाले पाहिजे. मोदी ७४ वर्षांचे विवाहित पुरुष आहेत. मेलोनी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे. मोदी यांच्या पत्नीच्या आत्मसन्मानाची तरी किंमत करा."

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या छायाचित्रांवरून भारतातील काही आयटी सेल नी Melodi हा हॅशटॅग ट्रेंड चालवला होता. मोदी आणि मेलोनी यांचे सार्वजनिक जीवनातील अधिकृत बैठका, हस्तांदोलन आणि हावभावांवर ‘कमरेखालील’ कमेंट करणारा हा ट्रेंड पाहून स्वतः मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत सेल्फी व्हिडीयो काढत कटाक्ष केला होता. हा ट्रेंड आयटी सेल मार्फत जाणीवपूर्क चालवला जात असल्याचं अनेक राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांची जवळीक असल्याचं दाखवण्यासाठी तसेच मोदी हेच या बैठकांच्या केंद्रस्थानी असल्याचं आभासी चित्र निर्माण करण्यासाठी आयटी सेल मार्फत विविध मोहीमा चालवल्या जातात. काँग्रेसने या मोहीमांवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News