धनगर आरक्षणाचा वाद पेटला, मंत्री राधकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला

Update: 2023-09-08 07:27 GMT

सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना आता ओबीसी आरक्षणावरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधकृष्ण विखे-पाटील गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. आज सकाळी शासकीय विश्राम गृह येथे पालकमंत्री विखे पाटील थांबले असता. त्यांना भेटायला धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते आले. यावेळी आरक्षणा संबंधीचे निवेदन विखे-पाटलांना देण्यात आले.

आरक्षणाच्या निवेदनावर चर्चा सुरू असतानाच धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकरत्याने आपल्या खिशातून भंडाऱ्याची पुडी काढून त्यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी या कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ पालक मंत्री विखे-पाटील गोंधळून गेले होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या अंगरक्षकांनी संबधित कार्यकर्त्यांस ताब्यात घेतले. त्याचवेळी आरक्षणावरून घोषणाबाजी करत असताना कार्यकर्त्यांला लाथा बुक्यानी मारहाण देखील करण्यात आली.


 



यावेळी या कार्यकर्त्याने यळकोट यळकोट जय मल्हार,ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे,कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा दिल्या.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आता धनगर आरक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील जाती देखील आक्रमक होताना दिसत आहेत.

Tags:    

Similar News