पृथ्वी थोडक्यात बचावला...

Update: 2023-02-17 07:22 GMT

भारताचा क्रिकेटपट्टू पृथ्वी शॉ यांची कार समजून त्याच्या मित्राच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. पृथ्वी शॉ ने दुसऱ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात ठेवून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने हा हल्ला झाला तेव्हा पृथ्वी शॉ त्या कारमध्ये नव्हता.

 क्रिकेटपटू पृथ्वी शॉ मुंबईतील अंधेरी येथील विमानतळ परिसरात असणाऱ्या सहारा स्टार येथे असताना आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर क्रिकेटपटू पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्यासाठी गेले होते. या दोन्ही आरोपींनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी सुद्धा घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा या दोघांनी पृथ्वी शॉ ला सेल्फी घेण्याबाबत विचारणा केली असता पृथ्वी शॉ ने त्यास नकार दिला. याचा राग मनात ठेवून या आरोपींनी पृथ्वी शॉच्या कारचा पाठलाग सुरु केला. पृथ्वी शॉची कार जोगेश्वरी लिंक रोडवरील पेट्रोल पंपावर आली असताना आरोपींनी ही कार समोरुन अडवली. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने कारच्या काचा फोडल्या. मात्र सुदैवाने पृथ्वी शॉ या कारमध्ये नव्हता. त्या कारमधून पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव, ड्रायव्हर आणि आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती. तर पृथ्वी शॉ दुसऱ्या कारने प्रवास करून निघून गेला होता.

दरम्यान हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी सुद्धा पृथ्वी शॉ कडे केली आणि खोट्या केसमध्ये अडकण्याची धमकी सुद्धा आरोपींनी पृथ्वी शॉ ला दिल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी पोलीसांना दिली. पृथ्वीचा मित्र काचा फुटलेल्या कारसह ओशिवरा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने याबाबतची तक्रार पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी त्याच्या तक्रारीवरुन सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आयपीसी कलम ३८४, १४३, १४८, १४९, ४२७, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आणि पोलिस या प्रकरणाची पुढील तपास करत आहेत. 


Full View

Tags:    

Similar News