न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे संघाची धुरा?
मुंबई : सध्या भारतीय संघ T20 World Cup मध्ये व्यस्त आहे. सुरुवातीचे दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय संघ आगामी सामने जिंकण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेल हे नक्की. भारताचं सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंड विरूद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे. दरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा असणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून कोण असणार? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
याचे कारण विश्वचषकापूर्वीच विराट कोहलीने स्पर्धेनंतर T20 संघाचं कर्णधापद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आगामी मालिकेसाठी कर्णधारपद कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा पद सांभाळेल असे सर्वांना वाटत असताना आता एका नव्याच नावाची चर्चा समोर येत आहे. हे नाव म्हणजे केएल राहुल.
BCCI शी संबधित एका विश्वासू सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत केएल राहुल याच्याकडे न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा असणार असल्याचे सांगितलं आहे. T20 विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीसाठी तसंच राहुल हा एक संघातील महत्त्वाचा आणि विश्वासू खेळाडू असल्याने हा निर्णय घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळवली जाईल.