ठाणे मनपा आयुक्त हे सत्ताधार्यांचे एजंट असल्यासारखे काम करतात- परांजपे
ठाणे मनपा आयुक्त सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक यांच्यात दुजाभाव करत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी नगरसेवकांनी आंदोलन केलं आहे.;
अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नाही तसेच, दूषीत पाणीपुरवठा प्रकरणी स्टेमच्या अधिकार्यांवरील कारवाई, स्मशानातील भ्रष्टाचार, लसीकरणातील दुजाभाव, नगरसेवकांची कामे या प्रकरणी ठाणे पालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातच आंदोलन केले.
यावेळी ठाणे मनपा आयुक्त सत्ताधार्यांचे एजंट असल्याचा आरोप शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.तर, आर्थिक कारण पुढे करुन पालिका आयुक्त नगरसेवकांची कामे रखडवत असतील तर कोवीड व्यतिरिक्त इतर मोठे प्रकल्प जागेवर जाऊन रोखू , असा इशारा शानू पठाण यांनी दिला.
ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडवण्यात आलेली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्याा प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्टेममधून होणार्या दुषित पाणी पुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचेही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांकडून कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका मुख्यालयााच्या प्रवेशद्वारातच धरणे आंदोलन केले.
यावेळी नगरसेवकांनी ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार की नाही? ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळणार्या स्टेमच्या अधिकार्यांवर कारवाई कधी करणार? स्मशानातही भ्रष्टाचार करणार्या ठेकेदारांना जेलमध्ये कधी टाकणार? लसीकरणातील भेदभाव कधी संपणार? हे प्रश्न विचारणारे फलक नगरसेवकांनी हातात घेतले होते.
यावेळी शहारध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे पालिका प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. लसीकरण हे ठामपाच्या अधिपत्याखाली होणे गरजेचे असताना शिवसेनेच्या शाखांमधून ते करण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी करुनही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही, एकूणच पालिका आयुक्त शिवसेनेचे एजंट असल्यासारखेच काम करीत आहेत. स्टेममधून नागरिकांना दूषीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर, स्मशानांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन कसूर करीत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जर या प्रश्नांवर तोडगा काढला नाही. तर ठाणे पालिका मुख्यालयासमोर सबंध राष्ट्रवादी काँग्रेस उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.